News

जिल्ह्यात आज एकाच दिवशी लागणार आठ लाख झाडे गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत मुख्य समारंभ

नाशिक : हरित कुंभांतर्गत बुधवारी (दि. १) शहर व जिल्ह्यात वृक्षलागवड मोहीम राबविण्यात येणार असून, यात सुमारे आठ लाखांहून अधिक लागवड करण्यासाठी तीनशेहून अधिक संस्था, संघटनांनी सहभागी होण्याची तयारी दर्शविली आहे. पालकमंत्री गिरीश महाजन, जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत होणार्‍या या उपक्रमात ५0 हजारांहून अधिक नाशिककर आपले योगदान देणार आहेत. जिल्हा प्रशासनाने ५ जून रोजी राबविलेल्या स्वच्छता मोहिमेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता त्या पार्श्‍वभूमीवर बुधवारी वृक्षलागवडीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. विविध शासकीय कार्यालये, निमशासकीय संस्था, स्वयंसेवी संस्था, संघटना तसेच व्यक्तींनी या मोहिमेत सहभागी होण्याची तयारी दर्शविल्याने सुमारे आठ लाखांहून अधिक वृक्षलागवड होईल, असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. जिल्हा परिषदेने ग्रामीण भागात ही मोहीम राबविण्याचे ठरविल्यामुळे येत्या दोन-तीन दिवस ती सुरूच राहील. त्याचबरोबर शहरातील ६२ ठिकाणी बुधवारी सकाळी सात वाजता स्वच्छता मोहीमही राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत शहरातील खासगी, तसेच महापालिकेच्या शाळा, महापालिकेचे सफाई कर्मचारी, लोकप्रतिनिधी व नागरिक सहभागी होतील. (प्रतिनिधी) ■ सकाळी सात वाजता संदर्भ सेवा रुग्णालय व त्यानंतर मविप्र महाविद्यालय येथे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत मुख्य समारंभ होणार आहे. याठिकाणी पर्यावरण वृद्धी व स्वच्छतेची शपथ घेण्यात येईल. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक जिल्ह्याचा नावलौकिक जागतिक स्तरावर नेण्याची मोठी संधी असल्याने नाशिकचे स्वच्छ व सुंदर रूप जगासमोर ठेवण्यासाठी स्वच्छता व वृक्षारोपण मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत मुख्य समारंभ