News

सात बारा नव्हे आता ‘सिटी सर्वे’

news-thumbnail

स्थावर मालमत्तेची नोंद जागेच्या सातबारावर नव्हे तर, सिटी सर्वेमध्ये करून मालमत्तेच्या नोंदी करून घेण्याचे काम भूमी अभिलेख विभागाने सुरु केले आहे. त्यामुळे नागरिकांनी घर, सदनिका, जागा आदि स्थावर मालमत्तेची नोंद तलाठी कार्यालयात सातबारावर जरी केली असेल, तरी त्यांना सिटीसर्वे मध्ये मालमत्तेची नोंद करून घ्यावी लागणार आहे. मालमत्तेचे व्यवहार झाल्यानंतर त्या परिसरातील महसुल विभागाचे अधिकारी म्हणून असलेल्या तलाठी कार्यालयात गाव नमुना सात अ आणि १२ मध्ये नोंदी करण्याचे सोपस्कार अपूर्ण राहून जात होते. तसेच बऱ्याच गृहनिर्माण सोसायट्यांचे कन्व्हेन्स डिड बांधकाम व्यावसायिकांकडून केले जात नाही. त्यामुळे हजारो गृहनिर्माण सोसायट्यांच्या सतबारांवर जुन्याच नोंदी राहून तिढा निर्माण होत होता. राज्य शासनाने गेल्या दोन वर्षापासून मालमत्तेच्या हस्तांतराच्या सोपस्कारासाठी पाऊल उचलून मालमत्ता खऱ्या मालकाच्या ताब्यात असली पाहिजे. यावर भर दिलेला आहे. त्यासाठी बांधकाम व्यावसायिकांना महाराष्ट्र फ्लट कायदा (मोफा) नुसार गृहनिर्माण सोसायट्यांचे कन्व्हेन्स डिड सहकार विभागाकडे करण्याचे सुचित केलेले होते. असे असूनही सोसायट्यांच्या सतबारावर बिल्डर आणि त्यांचे नातेवाईक यांचा भरणा असलेले कार्यकारणींचे नवे हातात नसल्याने शासनाने जमीन महसुल अधिनियम १९६६ च्या कलम २२ नुसार नागरिकांना त्यांच्या मालमत्तेची नोंद सिटीसर्वे मध्ये करण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी नागरिकांना हक्क चौकशीच्या नोटीस पाठवून कागदपत्रे सादर करण्याचे सुचित केले जात आहे. नाशिक शहरात भूमी अभिलेख उपअधीक्षकांच्या विविध कार्यालयांमार्फत नागरिकांना सूचना पत्र पाठविण्यात येत आहेत. त्यात नागरिकांना खरेदी खताची प्रत, सातबारा उतारा, बिनशेती आदेशाची प्रत, बिल्डींग प्लान, बांधकाम पूर्णत्वाचा दाखला आदि सदर करण्याचे सांगितले जात आहे.